जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव आगारातील अवैध पार्कींगबाबत एसटी कामगार सेनचे पदाधिकारी गोपाळ पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन विभागीय नियंत्रकांनी कारवाईचे निर्देश दिलेले आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव आगारात एसटी वाहकांच्या तिकीट पेट्या व मोबाईल लंपास होण्याचे प्रकार घडले होते. याबाबत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रसिध्दी सचिव गोपाळ पाटील यांनी प्रशासनाला पत्र देऊन सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याबाबत विनंती केलेली होती. कामगार सेनेच्या पत्राची गंभीर दखल घेऊन विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना केलेल्या होत्या या अनुषंगाने जळगाव विभागाच्या सुरक्षा व दक्षता अधिकार्यांनी कडक तपासणी मोहीम सुरू केलेली असून याबाबतचे पत्र जागोजागी प्रसारीत केलेले आहे.
या पत्रानुसार जळगाव आगाराच्या बाहेरील व्यक्तीने जर आपले वाहन आगाराच्या परिसरात आणले किंवा बाहेरील व्यक्तीने विनापरवानगी आगाराच्या परिसरात प्रवेश केला तर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्रात नमूद केले आहे. सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे बाहेरील व्यक्तींच्या आगार प्रवेशावर बंधन आले असून पार्किंगमधील वाहनांची संख्या कमी झालेली आहे. दरम्यान,
एसटी महामंडळाची सुरक्षा व्यवस्था सुरक्षित केल्याबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने एसटी प्रशासनाचे आभार मानले आहेत.