Home क्राईम अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई : साडेचार लाखांचा माल जप्त !

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई : साडेचार लाखांचा माल जप्त !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पाऊले उचलली आहेत. तिरपोळे शिवारात गिरणा नदी पात्रातून विनापरवाना वाळू चोरून नेणारा एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पोलिसांनी रंगेहात पकडला असून, या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गणेश त्र्यंबकसिंह जारवाल हे पथकासह तिरपोळे शिवारात गस्तीवर होते. यावेळी त्यांना एक विना क्रमांकाचा लाल रंगाचा ‘महिंद्रा ५७५ डीआय’ ट्रॅक्टर संशयास्पद रित्या येताना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, ट्रॉलीमध्ये अंदाजे ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू मिळून आली. या वाळू उपशाबाबत चालकाकडे कोणतीही शासकीय परवानगी किंवा रॉयल्टीची पावती नव्हती.

या कारवाईत पोलिसांनी ४,५०,००० रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि ६ हजार रुपयांची वाळू असा एकूण ४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक किशोर तुकाराम पावरा (वय १६, रा. तिरपोळे) आणि ट्रॅक्टर मालक भिमसिंग कैलास ठोके (रा. मेहुणबारे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक बाबासाहेब पगारे करत आहेत.


Protected Content

Play sound