वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच असून महसूल विभागाच्या पथकाने डंपरसह तीन ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई अजिंठा चौफुली परिसरात करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी १२ एप्रिल रोजी महसूल विभागाचे पथक अजिंठा चौफुली परिसरात असताना पथकाला रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास नेरी नाक्याकडून अजिंठा चौफुलीकडे येणारे एक पिवळ्या रंगाचे डंपर (क्र. एम.एच. १९, सीवाय ४०२९) वाळू वाहतूक करत असताना आढळून आले. या डंपरमध्ये तीन ब्रास आढळून आली. मात्र त्याचा कोणताही परवाना चालकाकडे नव्हता.

पथकाने ५ लाख रुपये किमतीचे डंपर, ९ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू ताब्यात घेतली. या प्रकरणी तलाठी राजू बाऱ्हे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डंपर मालक विक्की मांडवा, चालक पवन पाथरवट या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहेत.

Protected Content