जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकजवक कृष्णा लॉन समोरील रस्त्यावरून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकजवक कृष्णा लॉन समोरील रस्त्यावरून अवैधरित्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संदीप शांताराम शेगोकार, अनिल ब्रिजलाल नाईक, विशाल भाऊसिंग पवार आणि जितेंद्र कानेराम राठोड यांच्यासह ट्रॅक्टर मालक किशोर रामदास नाईक रा.जामनेर जि.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.