भुसावळ प्रतिनिधी । येथील युवकावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातील फरार आरोपीला आज नाशिक येथून अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरात ९ जुलै रोजी रात्री आदित्य लोखंडे या तरूणावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी आजवर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तथापि, या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी असणारा गणेश लक्ष्मीनारायण तल्लारे हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला होता. तो नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने नाशिकमधील पंचवटी भागातल्या मखमलाबाद नाका परिसरात पोलिसांनी शिताफिने त्याला अटक केली. त्याचा गोळीबारासह दरोड्याच्या एका प्रकरणातही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्याला आता भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.