यावल-रावेरात अचूक नियोजन : अमोल जावळेंचे ‘सायलेंट एक्सप्लोजन’ !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी- स्पेशल रिपोर्ट | जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. यात यावल आणि रावेर तालुक्यातील मतदारांच्या नियोजनाचा मोलाचा वाटा दिसून आला असून यासाठी अमोल हरीभाऊ जावळे यांचे कौशल्य अधोरेखीत झाले आहे.

आज जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीच्या निकालाची धामधुम सुरू आहे. याच्या निकालाचे विविध आयामातून विश्‍लेषण करण्यात येत आहे. मात्र केळी बेल्ट म्हणून समजल्या जाणार्‍या यावल आणि रावेर तालुक्यातून समोर आलेला कल महत्वाचा मानला जात आहे. याला समजून घेण्यासाठी आपल्याला सुमारे एक वर्ष मागे जावे लागेल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून डाव साधला होता. या वेळेत भाजपच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. यात भालोद येथील गणेश नेहेते यांनी लढा दिला होता. त्यांचा थोडक्यात पराभव झाला असला तरी त्यांनी दिलेली लढत ही कौतुकाची मानली गेली होती. त्यांच्या मागे उभे होते दिवंगत खासदार-आमदार तथा तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष हरीभाऊंचे चिरंजीव अमोल जावळे !

वास्तविक पाहता, हरीभाऊ यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे सामाजिक आणि राजकीय वारसदार म्हणून अमोल हरीभाऊ जावळे हे लागलीच प्रचंड सक्रीय होतील असे मानले जात होते. त्यांनी मात्र समोर न येतांना काम सुरू केले. मतदारसंघात गाठीभेटी घेत एकेकाला जोडत, जुन्या संबंधांना नव्यात गुंफत आगेकूच केली. मध्यंतरी त्यांना अडचणी देखील आल्या. मात्र यावर मात करत ते चालत राहिले. आजही कुठेच पुढे न येता त्यांचे काम सुरू आहे. यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी स्वाभीमानी बाणा दाखवत गणेश नेहते ते यांच्या पाठीशी उभे राहिले. यानंतर अलीकडच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते अजून सक्रीय झाले. यातच जिल्हा बँकेची निवडणूक आल्यानंतर त्यांच्या कौशल्याचा कस लागला.

जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत यावल आणि रावेर तालुका खूप महत्वाचा होता. यातील मते फुटण्याचा धोका होता. विशेष करून यात ‘क्रॉस व्होटींग’ होण्याची शक्यता असल्याने पॅनल प्रमुख थोडे चिंतेत होते. यासाठी या दोन्ही तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. या भागातील फैजपूर येथे मेळावा देखील घेण्यात आला. नंतर मुक्ताईनगरात मेळावा झाला. या दोन्ही ठिकाणी मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आला. कधी काळी प्रचंड वैभवशाली असणारा आणि परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या ‘मसाका’च्या विक्रीमागील षडयंत्र आणि कार्यकारणभाव यावर नेत्यांनी भाष्य केले. हा मुद्दा प्रभावी ठरला. अमोल जावळे गेल्या काही दिवसांपासून यावरच काम करत असल्याने हा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरला. ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील या दोन्ही मंत्र्यांसह वरिष्ठांनी त्यांना पाठबळ दिले. याचा अतिशय उत्तम परिणाम दिसून आला.

यावल आणि रावेर तालुक्यांमध्ये ‘पॅनल-टू-पॅनल’ मतदानाच्या ऐवजी मते फुटण्याची भिती होती. विशेष करून शेवटच्या टप्प्यात जातीच्या नावावर मते मागण्यात आली. यामुळे अर्थात, ‘क्रॉस व्होटींग’चा धोका असल्याने वरिष्ठ नेते चिंतेत होते. मात्र अमोल जावळे यांनी नेत्यांना शब्द दिला. एकही मत इकडे-तिकडे होणार नसल्याची ग्वाही दिली आणि झाले देखील तसेच. . .! दोन्ही तालुक्यांमधून शेतकरी विकास पॅनेलला मिळालेली मते ही फुटली नाहीत. यातच यावलमधील मतदान हे तर अगदी पॅनलच्या सर्व मतदारांना समान प्रमाणात झाले. आजच्या विजयात ही मते नक्कीच निर्णायक ठरली. ते या निवडणुकीतील पडद्यामागचे एक प्रमुख सूत्रधार ठरले.

अमोल हरीभाऊ जावळे यांच्याकडे तसे म्हटल्यास भाजपमधील कोणतेही पद नसले तरी ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली त्यांची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. दोन्ही तालुक्यातील सर्व सहकार्‍यांना यथायोग्य सन्मान देत, त्यांना पुढे करून आपण स्वत: मागे राहत ते काम करत आहेत. ते स्वत: कार्पोरेट क्षेत्रात काम करतात, मॅनेजमेंटमधील वरिष्ठ पातळीवरील कामांचा असलेला त्यांचा अनुभव हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात किती उपयुक्त ठरू शकतो ? याची प्रचिती जिल्हा दुध संघातील निकालातून आली आहे. ‘पक्ष-एके-पक्ष’ ही भूमिका त्यांनी स्वत: अंगिकारली असून याचा भविष्यातील वाटचालीत त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

Protected Content