पुणे प्रतिनिधी । येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात ब्रिजिंग एक्सरसाइज करताना झालेल्या अपघातामध्ये भारतीय सेनेच्या २ जवानांना आपले प्राण गमवावे लागले असून ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (दि.२६) सकाळी घडली असून याबाबत अधिकृत माहिती अद्यापही मिळालेली नाहीय.
याबाबत अधिक माहिती अशी की, लष्कराच्या दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) पूल उभारणी सरावादरम्यान (ब्रिजिंग एक्सरसाइज) अपघात झाला आहे. आज सकाळी 11:30 सुमारास जवान बॅली सस्पेन्शन ब्रिज लाँच करण्याचे प्रशिक्षण केले जात होते. या दरम्यान एका बाजुच्या ब्रिजचा टॉवर पडला. या दुर्घटनेत एकूण नऊ जवान जखमी झाले आहेत. तर दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) भारतीय लष्कराचे इंजिनिअर्सचे एक प्रमुख तांत्रिक आणि सामरिक प्रशिक्षण संस्था आहे. यात कॉम्बॅट इंजिनिअर, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विस, बॉर्डर रेड्स इंजिनिअरिंग सर्विस (BRES) आणि सर्वे या सर्वांचा समावेश आहे. या घटनेतील सर्व जखमींना खडकी येथील लष्करी दवाखान्यात हलविण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञांचे पथक उपचार करत आहे.