तेलंगणा राज्यातील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावातून अटक!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील चंदानगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जळगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) असे या आरोपीचे नाव असून, तो गुन्हा घडल्यापासून सुमारे तीन महिन्यांपासून फरार होता.

चंदानगर पोलीस स्टेशनचे पथक आरोपीच्या शोधासाठी जळगाव जिल्ह्यात दाखल झाले होते. या पथकाने जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना गुन्ह्याची माहिती दिली आणि आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना या पथकाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थागुशा जळगावचे सहाय्यक पोलीस फौजदार विजयसिंग पाटील आणि पोलीस हवालदार अक्रम शेख यांचे एक विशेष पथक तयार करून त्यांना आरोपीला शोधून ताब्यात घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले.

या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अझहर निजाम खाटीक याचा शोध सुरू केला. तो मेहरुण परिसरात लपल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पाठलाग करून पोलिसांनी अझहरला शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला चंदानगर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. **