समृध्द व सुरक्षित जळगावसाठी वचनबध्द- अभिषेक पाटील

abhishek patil app

जळगाव प्रतिनिधी । समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांच्या समग्र विकासासाठी झटून समृध्द व सुरक्षित जळगावसाठी आपण वचनबध्द असल्याची ग्वाही आगामी निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिध्द करतांना महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असतांनाच, प्रचार शिगेला पोहचला आहे. दरम्यान, या टप्प्यात विविध उमेदवार आपापले जाहीरनामे प्रकाशित करत आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी, काँग्रेस, पीआरपी(कवाडे गट), शेकाप आणि स्वाभीमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे जळगावातील उमेदवार अभिषेक पाटील यांनी निवडणुकीसाठी जाहीरनामा जनतेचा या नावाने आपले व्हीजन डॉक्यमेंट प्रसिध्द केले आहे. यात त्यांनी समग्र विकासाची ग्वाही दिली आहे.

जळगाव शहरात पायाभूत सुविधांची वानवा असल्याची बाब लक्षात घेत जाहीरनाम्यात यावर भर देण्यात आलेला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम मार्गी लावणे; घंटागाड्यांचे व्यवस्थित नियोजन करून कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लावणे; गाळेधारकांचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटवणे; झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचा निवारा देणे; महिलांसाठी शहरात विविध भागांमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा पुरवणे; खड्डेमय रस्ते आणि समांतर रस्ते यांचे योग्य नियोजन करणे; घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन; नाना-नानी पार्क विकसित करणे, मेहरूण तलावानजीक असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा विकास करणे आदी कामांची ग्वाही अभिषेक पाटील यांनी दिली आहे.

अभिषेक पाटील यांनी सुरक्षित जळगावसाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील दिलेली आहे. चोरी व दरोड्यांना आळा घालण्यासाठी शहरात सीसीटिव्हीचे जाळे उभारण्याचे आश्‍वासन त्यांनी दिलेले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम राखली जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. महिला सुरक्षा व सक्षमीकरणाराला प्राधान्य देण्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. दरम्यान, शिक्षण हा अतिशय महत्वाचा घटक असल्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांना डिजीटल करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. शिक्षकांचे थकीत वेतन वेळेवर देण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले आहे. तरूणांचे क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून शहरातील लोकसंस्कृतीची जोपासना करण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. कलावंतांच्या मानधनासाठीही ते प्रयत्न करणार आहेत. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे बेरोजगारांना भत्ता देण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील असे यात म्हटले आहे. जळगाव शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी शहर बससेवा सुरू करण्याचे आश्‍वानदेखील त्यांनी दिले आहे. या माध्यमातून जळगावला समृध्द आणि सुरक्षित करण्यात येणार असल्याची ग्वाही अभिषेक पाटील यांनी दिली आहे.

Protected Content