जळगावचा बट्टयाबोळ करणारांना जनता धडा शिकवणार : अभिषेक पाटील

abhishek pati prachar jalgaon

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील आमदारकीसह महापालिका ताब्यात असतांनाही भाजपने कोणतीही विकासकामे केली नसून शहराचा बट्टयाबोळ करणारांना जनता धडा शिकवणार असल्याचे प्रतिपादन महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी केले. ते प्रचारादरम्यान आयोजित कॉर्नर बैठकीत बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना शहरात प्रचार करतांना परिवर्तनाचा नारा बुलंद केला आहे. त्यांनी मंगळवारी शहरातील पिंप्राळा आणि हुडको परिसरात प्रचार फेरी काढून या भागात कॉर्नर बैठका घेतल्या. याप्रसंगी त्यांनी सत्ताधार्‍यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, सद्यस्थितीत भाजपची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आहे. आमदार व महापौरपद तर एकाच घरात असून बहुतांश नगरसेवक भाजप आणि सहकारी सहकारी शिवसेनेचे आहे. यामुळे विरोधाची कोणतीही आडकाठी नसतांनाही विकास न करता जळगाव हे भकास करण्यात आल्याचे आज जळगावकर पाहत आहेत. शहराचा अक्षरश: बट्टयाबोळ करण्यात आलेला असून जनतेला याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. भाजपची ही दंडेलशाही, घराणेशाही आणि अकर्मण्यता मोडून काढण्याची सुवर्णसंधी जळगावकरांना विधानसभा निवडणुकीत चालून आलेली आहे. याचा लाभ घेतला नाही तर पुढील पाच वर्षे पुन्हा पस्तावा करण्याची वेळ येणार आहे. यामुळे जनतेने परिवर्तन करावे असे आवाहन अभिषेक पाटील यांनी याप्रसंगी केले.

अभिषेक पाटील यांच्या प्रचार फेर्‍या आणि यानंतरच्या कॉर्नर बैठकीप्रसंगी समाजाच्या सर्व स्तरांमधील मान्यवर उपस्थित होते. यात विशेष करून अल्पसंख्यांक समुदायातील तरूणाईची उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान, प्रचार करतांना अनेक तरूण हे अभिषेक पाटील यांच्यासोबत सेल्फी घेतांना दिसून आले.

Protected Content