महायुतीतील विसंवादाचा जळगावात ‘साईड इफेक्ट’ : शिवसेनेची आक्रमक भूमिका

jalgaon news 1

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील चार जागांवर शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपने बंडखोरांना रसद पुरवण्याची प्रतिक्रिया जळगावात उमटण्याची शक्यता आहे. येथे शिवसेनेतील एक गट महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना पडद्याआडून मदत करण्याची शक्यता बळावली असून हे संघर्षाचे राजकारण जळगावातील समीकरण बिघडवू शकते.

जळगाव जिल्ह्यात महायुतीची माती झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव, चोपडा आणि पारोळा-एरंडोल या मतदारसंघात भाजप समर्थकांनी बंडाळी करून शिवसेनेच्या मातब्बर उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. याबाबत खुद्द सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त करूनदेखील कोणताही फरक पडलेला नाही. सर्व बंडखोर उमेदवार हे भाजपची संपूर्ण यंत्रणा वापरून प्रचार करत असल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. याचे पडसाद आता जिल्हाभरात उमटण्याची शक्यता आहे. कालच रावेर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी भाजपला इशारा देऊन बंडखोरांना आवर घालण्याचा इशारा दिला होता. तर जळगावातदेखील याचे पडसाद उमटणार असून पडद्याआड याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

घरकूलच्या प्रकरणात व विशेष करून निकालानंतर ना. गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन आणि त्यांच्या समर्थकांना कोणताही मदत न केल्याची बाब उघड आहे. यामुळे दादा समर्थकांनी अद्याप आपले पत्ते खुले केले नसले तरी पडद्याआड मोठ्या प्रमाणात खल सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी हे महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्यासोबत प्रचारात फिरत असले तरी ७, शिवाजीनगर, जळगाव येथून आलेला संदेशच शिवसेनेची भूमिका ठरवणार आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी दादा समर्थकांना निर्णायक भूमिका घेण्यासाठी गळ घातल्याचे वृत्त आहे. विशेष करून ना. गुलाबराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत, भाजपला धडा शिकवण्यासाठी मोर्चेबांधणी केलेली आहे. यातच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांची कोरी पाटी असून अद्याप ते कोणत्याही गटबाजीत नसल्यामुळे त्यांना या सर्व घडामोडींचा लाभ होण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यांना बेरजेचे राजकारण लाभदायक ठरणार का? याचे उत्तर निकालातूनच मिळणार आहे.

Protected Content