जिल्ह्यात कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीविषयक मोहिमेचा शुभारंभ (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृतीविषयक व्यापक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. रामानंद जयप्रकाश,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जळगाव जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे आदी उपस्थित होते.  

कोविड लसीकरण जनजागृतीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे यासारखे उपाय करण्याचे आवाहन केले. आता कोविड योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. लवकरच सर्वसामन्यांचे  लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज असतील ते दूर करण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. 

या प्रदर्शनातून लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. यावेळी लोककलाकार उपक्रमांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करतील आणि मनोरंजनाच्या माध्यमातून स्थानिक कलांद्वारे हे उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवले जातील. या उपक्रमांतर्गत 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुण्यातील रिजनल आऊटरीच ब्युरोतर्फे तयार करण्यात आलेली फिरती बहुमाध्यमी मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि अमळनेर या तालुक्यात फिरणार आहे. चित्र रथ निर्मितीमध्ये जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे याला सहकार्य लाभले आहे. या मोबाईल व्हॅनचा मुख्य उद्देश म्हणजे कोविड लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे तसेच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणे हा आहे.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/446609859814404

 

Protected Content