जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद शहरातील साती बाजार परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची घटना सामोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरातील साती बाजार परिसरात १७ वषीय अल्पवयी मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही आपल्या घरी एकटी असतांना गावातील अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. दरम्यान पिडीत मुलगी घरात दिसली नाही म्हणून तिच्या वडीलांसह नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलीची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.