श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू काश्मीरच्या डोडा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे गजय सिंग राणा यांची पिछेहाट झाली असून आम आदमी पक्षाने येथे खाते उघडले आहे. आपचे मेहराज मलिक येथे विजयी झाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये आपला संधी मिळणे ही आश्चर्याची गोष्ट मानली जातेय. कारण हरियाणासारख्या राज्यात आपची पिछेहाट झालेली आहे.
आपने २०२२ मध्ये डोडामध्ये भव्य रॅली काढली होती. तेव्हापासून आप तिथे सक्रिय आहे. तर, मलिक हे डोडा जिल्हा विभाग परिषदेचे सदस्य असून स्थानिक प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यावरून ते सतत चर्चेत होते. रस्ता रोको करणे, अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठेवणे आदी प्रकरणांमुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठीचे भाजपाचे स्टार प्रचारक होते. १४ सप्टेंबर रोजी डोडा या ठिकाणी असलेल्या मैदानावर मोदींनी सभा घेतली. जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली सभा होती. परंतु, त्याच जागेवर भाजपाचा पराभव झाला आहे. येथे गेल्या ४० वर्षांत या ठिकाणी भेट देणारे ते एकमेव पंतप्रधान ठरले होते.