आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या खासदारांचाही बंडाचा पवित्रा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड करून सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता शिवसेनेतील खासदारही बंडाच्या पवित्र्यात दिसून आले आहेत. मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीला बहुतांश खासदारांनी दांडी मारल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट शिवसेनेपासून वेगळा झाला. यानंतर नाट्यमय घटना घडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हे बंड झाल्यानंतर काही दिवसांनीच खासदारांमध्येही अवस्थता असल्याचे दिसून आले होते. श्रीकांत शिंदे, भावना गवळी, राहूल शेवाळे आदी खासदारांनी याबाबत उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले होते. मात्र त्यांच्या मागणीवर काही निर्णय घेण्यात आलेला नाही. तर, खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी आज मातोश्रीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील १८ पैकी तब्बल १० खासदारांनी दांडी मारल्याचे दिसून आले. अर्थात, या बैठकीला पक्षाचे फक्त आठ खासदार उपस्थित होते. यामुळे उर्वरित १० खासदार हे वेगळा मार्ग पत्करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर बैठकीस उपस्थित राहणारे दोन ते चार खासदार यांना येऊन मिळू शकतात. हे १२ ते १४ खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन स्वतंत्र गट असल्याचे पत्र देऊ शकतात. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Protected Content