मुक्ताईनगर, विशेष प्रतिनिधी | येथील आदिशक्ती मुक्ताईच्या पंढरपूरला गेलेल्या पालखीचे आज (दि.६) येथे आगमन झाले. गेल्या दोन महिन्यांपूर्वी येथून आषाढी एकादशीनिमित्त ही पालखी पंढरपूरला गेली होती. दोन महिन्याच्या प्रवासानंतर आज ती परतली आहे.
आषाढी एकादशीला परंपरेने पंढरीला विठुरायाच्या भेटीला गेलेली संत मुक्ताबाई पालखीचे आगमन आज येथे झाल्यानिमित्त या आगमन सोहळ्यासाठी ८२ भजनी मंडळांनी सहभाग नोंदवत पालखीचे भव्य स्वागत केले. येथील महामार्गावरील नवीन मुक्ताई मंदिर येथे मुक्ताईच्या पालखीचे भव्य स्वागत व दर्शन माजी मंत्री एकनाथ खडसे, रवींद्र भैय्या पाटील यांनी केले. जुन्या मुक्ताबाईच्या मंदिरापर्यंत ८० दिंडींसमवेत भव्य मिरवणूक सोहळा यानिमित्त पार पडला. यावेळी आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मध्यप्रदेश मधील हजारो वारकऱ्यांनी दर्शन घेतले. हरिनामाच्या गजरात मुक्ताईच्या जयघोषात मुक्ताईनगर नगरी भक्तिमय झाली होती.