भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विनापरवाना गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूस घेऊन भुसावळ शहरातील यावल नाका येथे दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी शनिवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता अटक केली. त्याच्यावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित सुनील सपकाळे (वय-२१, रा. अंजाळे ता. यावल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
भुसावळ शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील यावल नाका परिसरात रोहित सपकाळे हा तरुण दुचाकीवर येऊन हातात गावठी बनावटीचा कट्ट्याचा धाक दाखवत दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिवार १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने कारवाई करत संशयित आरोपी रोहित सपकाळे याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतूस आणि (एमएच १९ डीएफ २७९८) क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहित सुनील सपकाळे यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल इब्राहिम सय्यद करीत आहे.