गेंदालाल मील परिसरात बंद घर फोडून ५० हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मील परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या वस्तू, टीव्हीसह रोकड लांबविल्याची घटना मंगळवारी २५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अय्युब दिलावर खान हे आपल्या परिवारासह गेंदालाल मील परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा अल्तमश खान अय्युब खान हे मासुमवाडी येथे राहतात. अय्युब दिलावर खान हे ईद साजरी करण्यासाठी मुंबई येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी गेंदालाल मील परिसरातील घर बंद केले होते. दरम्यान, घर बंद असल्याची संधी पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घरफोडून घरातून टिव्ही, सोन्याच्या वस्तू आणि ३५ हजारांची रोकड असा एकुण ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. अल्तमश खान हा मंगळवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता गेंदालाल मील येथील वडीलांच्या घरी गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. आत जावून पाहणी केली तर घरातील सर्व वस्तू अस्तव्यस्त दिसून आल्या. आणि घरात चोरी झाल्याचे समोर आले. त्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content