भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील विकास कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणाला शिवीगाळ करत हातावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर दुखापत करत दीड हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून त्याची पत्नी व आईला धमकी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार माणिक चौधरी वय-३५, रा.विकास कॉलनी, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून केबल ऑपरेटर म्हणून तो कामाला आहे. गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता संशयित आरोपी हेमंत जगदीश पैठणकर रा. शिव कॉलनी, भुसावळ याने तुषारकडे इंडिका गाडी आणि १ हजार रुपये मागितले, त्यावर तुषारने गाडी आणि पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून संशयित आरोपी हेमंत पैठणकर याने शिवीगाळ करून हातातील लोखंडी कोयत्याने वार करून तुषार चौधरी याला गंभीर दुखापत करत त्याच्या खिशातील दीड हजार रुपये जबरी हिसकावून घेतले. तसेच तुषारची पत्नी भावना आणि आई रेखाबाई यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या घटनेबाबत तुषारने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता संशयित आरोपी हेमंत पैठणकर यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव सांगळे करीत आहे