अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकी अपघातात जखमी झालेल्या विकास उर्फ विकी पारधी (वय-३० रा. कळमसरे ता.अमळनेर) या तरूणाचा गुरूवार ११ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील विकास पारधी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सेंटिग काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होतो. लहानपणापासून मेहनती आणि प्रामाणिक होता. विकास सेंटिंग काम शिकल्याने त्याला बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत असल्याने तो दुचाकीवर लांबपर्यंत कामावर जावून आपल्या परिवाराला मदत करत होते. विकास पारधी यांचे गाव साकरे ता. अमळनेर होते. त्याच्या आई सोबत लहानपणीच मामाकडे कळमसरे येथे आपल्या आई, बहीण, लहान भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता. मागील दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता.
बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कामावरून अमळनेर येथून कळमसरे येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. अमळनेर शहरातील ताप महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्याला तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हेाते. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे रवाना केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवारी ११ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे परिवारातला कर्ता पुरुष गेल्याने परिवाराचा आधारच हरपला. यामुळे त्याची आई, पत्नी, बहीण लहान भाऊ यांचे दुःख पाहून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले होते. दुपारी ३.३० वाजता कळमसरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात सर्वांशी मितभाषी बोलणारा विकासचे अचानक जाण्याने कळमसरे सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो येथील प्राथमिक शिक्षक गणेश पारधी यांचा भाचा असून त्याच्या पच्यात आई, पत्नी, बहीण व भाऊ असा परिवार आहे.