किक्रेट खेळताना वीज कोसळल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ढेबेवाडी –पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यात चार दिवसांपासून वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच याच भागातील मुटलवाडी (काळगाव) येथे क्रिकेट खेळत असताना अचानक अंगावर वीज कोसळून एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रोहन डांगे असे या मृत मुलाचे नाव असून तो मूळचा शिराळा तालुक्यातील मांगले गावचा रहिवासी होता.

रोहन डांगे हा अतिशय चांगला क्रिकेट खेळाडू होता. तो ढेबेवाडी खोर्‍यातील सतीचीवाडी (निवी) गावच्या संघात आयकॉन खेळाडू म्हणून खेळत होता. दोन दिवसांपूर्वी मुटलवाडी (काळगाव) येथे क्रिकेट सामने सुरू होते. त्यावेळी अचानक वादळी पावसाने सुरुवात केली. पावसामुळे अनेक खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी आश्रयाला थांबले होते. रोहन हादेखील तेथील एका झाडाखाली थांबला होता. मात्र अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. इतर खेळाडूंनी तत्काळ त्याला कराडला रुग्णालयात नेले. मात्र रोहनचा वाटेतच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण ढेबेवाडी पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

Protected Content