जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आदल्या दिवशी आईकडे झोपण्यासाठी गेलेल्या अजय कॉलनी येथील महिलेच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करत रोख १५ हजार रुपयांसह सोने चांदीचे शिक्के व चांदीच्या देवी देवतांच्या मूर्ती असा एकूण १ लाख ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला. घरात साफसफाई व देवपूजेसाठी आल्यानंतर शुक्रवारी २८ जून सकाळी १०.३० वाजता ही चोरी लक्षात आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये तळ मजल्यावर दीपाली मंगलेश पांडे या पती, दोन मुलींसह राहतात. पती नोकरीनिमित्त सुरतला राहतात, तर मोठी मुलगी रिध्दी ही भोपाळला अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. फ्लॅटमध्ये दीपाली पांडे व त्यांची लहान मुलगी राहतात. याच अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर त्यांची आई सुनंदा खानापूरकर या राहतात. २७ जून रोजी संध्याकाळी पांडे या फ्लॅटला कुलूप लावून आईकडे गेल्या. हीच संधी साधत चोरट्यांनी फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील रोख १५ हजार रुपयांसह सोने चांदीचे शिक्के, देवी देवतांच्या मूर्ती चोरून नेल्या.
शुक्रवारी २८ जून रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास दीपाली या घरात साफसफाई व देवपूजा करण्यासाठी घरी आल्या. त्यावेळी दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी आईसह शेजारच्या मंडळींना माहिती दिली. घरात पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील सोने चांदीचे शिक्के, रोख १५ हजार असा एकूण एक लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे दिसले.
याप्रकरणी महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.