अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील झामी चौकातून इद ए मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणूकीत एका अज्ञात व्यक्तीने प्लास्टिकचा पाईप फेकून मारल्याने घराच्या ओट्यावर बसलेल्या २४ वर्षी महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना गुरूवारी १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुस्लिम बांधवांचा पवित्र सण इद ए मिलाद सणाच्या निमित्ताने अमळनेर शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक गुरूवारी १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता अमळनेर शहरातील झामी चौकात आलेली असतांना मिरवणूकीत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने प्लास्टीकचा पाईप फेकून मारल्याने ओट्यावर बसलेल्या लता हरीशचंद्र नातबुवा वय २४ रा. झामी चौक, अमळनेर यांच्या डोक्याला लागल्याने गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी दुपारी ४ वाजता लता नातबुवा यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.