कल्याण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कल्याणमध्ये एका उच्चभ्रू परिसरातील एका अल्पवयीन मुलावर वॉचमनने अत्याचार केला आहे. तो अल्पवयीन मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. काही वेळेनंतर अल्पवयीन मुलगा पुन्हा घरी आला आणि त्याच्यासोबत वॉचमनमने घाणेरडे कृत्य केल्याचे त्याने घरात सांगितले. क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. वॉचमननेच हे कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी सुनील मिश्रा याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. आपले मित्र आणि वॉचमनसोबत तो क्रिकेट खेळत होता. मात्र वॉचमनच्या डोक्यात भलताच कट शिजत होता. क्रिकेट खेळताना वॉचमनने चेंडू लिफ्टच्या दिशेने फेकला. त्यानंतर मुलाला त्याने लिफ्टजवळ गेलेला चेंडू आणण्यास सांगितले. आडोशाचा फायदा घेत वॉचमन देखील लिफ्टकडे गेला. तिथेच वॉचमनने मुलावर लैंगिग अत्याचार केले. याबाबत कुणाला सांगू नको असा दम देखील वॉचमनने मुलाला दिला.
काही वेळातच अल्पवयीन मुलगा घरी परतला आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार घरात सांगितला. घडल्या प्रकाराची खात्री केल्यानंतर मुलाच्या आईने तातडीने महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वॉचमन सुनील मिश्राविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. वॉचमनने याआधी अशाप्रकारे अन्य मुलांसोबत काही कृत्य केलं आहे का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.