


छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडरवर ट्रकने समोरील वाहनास धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. गुरूवारी १६ मे रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ट्रकमधील चालकासह दोन जण जखमी झाले आहेत. समृद्धीवर चॅनेल क्रमांक ३२५.१ वर नागपूर कॉरिडॉरमध्ये हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथील एका कंपनीचे साईन बोर्ड घेऊन अंबिकापूरकडे ट्रक जात होता. ट्रक चालक राजकुमार यादव यास डुलकी लागल्याने त्याच्या ताब्यातील ट्रक समोरील वाहनावर जावून आदळला. या अपघातात आयशर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामधील संबंधित कंपनीचा बोर्ड फिटिंग करणारा व्यक्ती वसीम कुरेशी व वाहन चालक राजकुमार यादव हे दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले.अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. ट्रकने ज्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली, ते वाहन कोणते होते, हे समजू शकले नाही.



