शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ठगाला मुंबईतून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विद्यूत कॉलनीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्याचे आमीष देत ९ लाख ८२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील जळगाव सायबर पोलिसांनी २४ मार्च रोजी एका संशयित आरोपीला मुंबई चेंबूर परिसरातून अटक केली आहे.अशी माहिती सायबर पोलीसांनी मंगळवारी २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता दिलेल्या प्रसिध्दीद्वारे कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यूत कॉलनी परिसरात ३३ वर्षीय महिला आपल कुटुंबासह वास्तव्याला आहे. २८ नोव्हेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ त्यांना वेगवेगळ्या चार मोबाईल क्रमांकवरून फोन आले. आपण अपेक्स कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांनी महिलेला अपेक्स नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून शेअर खरेदी करण्याच्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने ९ लाख ८२ हजार रूपये वेगवेगळ्या बँक खात्यात मागवून घेतले. दरम्यान, महिलेला नफा आणि मुद्दल न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी १६ जानेवारी रोजी जळगाव सायंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात जळगावातील सायबर गुन्हे शोध पथकाने अधिक तपास केला असता संशयीत आरोपी अशरफ उमर सैय्यद, वय-२६ रा. ह.मु. विष्णु नगर, म्हाडा वसाहत, चेंबुर यास २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सायबर पो.स्टे.चे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वसंतराव बेलदार, प्रदीप चौधरी, प्रशांत साळी, हेमंत महाडीक तसेच जाधव व गौरव पाटील यांनी केली आहे.

Protected Content