चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील अनेक भागात घंटागाड्यांकडून नियमितपणे कचरा संकलन होत नाही. ऐरवी दोन दिवसाआड येणाऱ्या घंटागाड्यांची फेरी काही भागामध्ये आता आठ ते नऊ दिवसांनी होत आहे. त्यामुळे नागरिकांना घरात कचरा साचून ठेवावा लागत आहे. याबाबत सजग नागरिक संघातर्फे नुकतेच नगराध्यक्षांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले असून यावर चर्चा करण्यात आली.
परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्यामुळे रस्त्यावर कचऱ्याच्या ढीग तयार होत आहे. याचबरोबर, डंपिंग ग्राउंडच्या रस्त्याची खराबी झाली असल्याने घंटागाडी तेथे जात नाही. यासाठी ताबडतोब रस्त्यावर त्वरित मुरूम टाकून रस्ता सुरू करण्यात यावा. तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कच-यामुळे अनेक प्रकारची उग्र वास, रोगराई इतर समस्यांना सामोरे जावे लागत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दुभाजकावर मातीचे ढीग
रेल्वे स्टेशन, सिग्नल चौक, घाटरोड, हिरापूर रोड, भडगाव रोड याठिकाणी रस्त्यावरील दुभाजकांच्या बाजूला साचलेल्या मातीमुळे शहरात प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. रस्त्यावरील व्यापारांना तसेच दुचाकी वाहनधारकांना सुद्धा त्रास होत आहे. धुळीमुळे श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत आहे. घंटागाडीमधील लावलेले गीत ‘गाड़ी वाला आया घर पे’ हे बदलवून ‘जनजागृती, पर्यावरणमय गीत’ लावून प्रबोधन होईल. याबाबत नगरपालिकेत त्वरित दखल घ्यावी, यासाठी सजग नागरिक संघातर्फे नुकतेच नगराध्यक्षांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले असून यावर चर्चा करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदनावर गणेश पवार, दिलीप घोरपडे, उदय पवार, श्रीकांत भामरे, स्वप्नील कोतकर, मुराद पटेल, विजय गायकवाड, तमाल देशमुख, खुशाल पाटील, प्रताप देशमुख, सचिन सावळे, सागर नागणे, हरीश जैन, अजीज खाटीक, कुणाल कुमावत, डॉ.प्रदीप चव्हाण, मंगेश शर्मा, अजीज खाटीक यांच्यासह आदि उपस्थित होते.