बंगळूरू, वृत्तसंस्था | येत्या २६ डिसेंबर रोजी दिसणारे सूर्यग्रहण हे २०१९ या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. दक्षिण भारतातुन केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यातील काही शहरातून हे दुर्मिळ असे कंकणाकृती दिसेल तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास दिसेल. या ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ८.०० वाजता होईल तर भारतातून ८.१० मिनिटांनी सुरवात होइल आणि ११.१० मिनिटांनी ग्रहणाची समाप्ती होईल. हे वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण असून यानंतर २०२० साली २१ जूनला पुन्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.
कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणावेळी पृथ्वी व चंद्राचे अंतर कमी असते त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे दृश्य स्वरुपात सारख्याच आकाराचे दिसते. म्हणून सूर्य बिंब हे चंद्रबिंबाने पूर्ण झाकले जाते, परंतु कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीचे अंतर जास्त असते, तेव्हा सूर्य बिंब मोठे आणि चंद्र बिंब लहान असते, त्यामुळे चंद्रामुळे सुर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही, त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा बाजूने दिसते, त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. यंदाच्या ग्रहणावेळी चंद्राची गडद सावली ही केवळ ११८ किमीच्या रुंद पट्यावर पडणार असल्याने त्याच प्रदेशातून कंकणाकृती स्थितीचे सूर्यग्रहण दिसेल.
कंकणाकृती सूर्यग्रहण कुठून दिसेल :- ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबियातून होवून ओमान, भारत, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका, इंडोनेशिया या देशातील काही भागातुन दिसेल. दक्षिण भारतात केरळमधील कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड. कर्नाटकातील मंगलोर, म्हैसूर, तामिळनाडूतील कोईमतूर, इरोडे, करूर, दिंडीगुल, कोझीकोडे, उदकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई येथून कंकणाकृती स्थिती दिसेल.
खंडग्रास सूर्यग्रहण :- महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातुन ६० ते ७० टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. सूर्य ग्रहणाच्या वेळा खंडग्रास ग्रहणाची सुरवात २६ डिसेंबर रोजी सकाळी ७.५९.५३ होईल, खग्रास ग्रहणाची सुरवात ९.०४.३३, खग्रास ग्रहणमध्य १०.४७.४६, खग्रास ग्रहणाचा शेवट-१२.३०.५५, खंडग्रास ग्राहणाचा शेवट-१.३५.४० वा होईल. महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी ८.१० वाजेपासून दिसेल,९.३२ वा. ग्रहण मध्य असेल तर ११.०० वा ग्रहण समाप्ती होईल.
ग्रहणात घ्यावयाची काळजी :- सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांने पाहू नये, त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळे खराब होणे किंवा अंधत्व येऊ शकते. ग्रहण पाहण्यासाठी ग्रहण चष्मे, काळे वेल्डींग ग्लास किंवा अगदी काळी सुरक्षित एक्स रे फिल्म मधुनच बघावे. साध्या आरश्याच्या काचेचा कैमरा करून भिंतीवर सुर्यबिंब पाडून ग्रहण बघावे. महाराष्ट्र आणि देशातील अनेक संस्था ग्रहण निरीक्षण शिबिरांचे आयोजन करणार आहेत. कुठल्याही अंधश्रद्धा न बाळगता, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून सगळ्यांनी सूर्यग्रहण बघावे.