मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या एका विमानाची फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला धडक बसल्याने ३६ फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरच्या पंतनगर येथील लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी रात्री घडली आहे. आणखी जखमी फ्लेमिंगोंचा परिसरात शोध घेणे सुरू आहे.
मुंबई विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईके ५०८ क्रमांकाचे अमिराती कंपनीचे विमान काल, सोमवारी रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरत असताना ही घटना घडली. विमान लँडिंगसाठी अंतिम टप्प्यात असताना ही घटना घडली. परंतु पक्ष्यांची धडक बसल्याने लँडिंगवर काही परिणाम झाला नाही. विमान सुरक्षितपणे खाली उतरण्यात पायलट यशस्वी झाला.
विमान उतरताच फ्लेमिंगो पक्ष्यांना धडक बसल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांना देण्यात आली. सध्या हे विमान ग्राऊंड करण्यात आले असून एअरक्राफ्ट इंजिनियर या विमानाची तपासणी करत आहे. खारफुटी संरक्षण कक्षाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एस. वाय. रामाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात २९ फ्लेमिंगोंचे मृतदेह सापडले आहे. या घटनेत आणखी फ्लेमिंगो मारले गेले आहेत का, याचा शोध सुरू आहे.