खडसेंना आमदार करू नका : दमानिया यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी l एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असून त्यांनी अलीकडेच केलेली भाषा पाहता त्यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्यपाल भगत सिंह यांना निवेदन दिले आहे.

भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून ते राष्ट्रवादी च्या माध्यमातून विधानपरिषदेवर जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भात कोणत्याही क्षणाला एकनाथराव खडसे यांची घोषणा होऊ शकते. तसेच त्यानंतर त्यांना मंत्रीपद देखील मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांच्यावर आधी आरोपांची सरबत्ती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. अंजली दमानिया यांनी शनिवारी सायंकाळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन खडसे यांना आमदार करू नये अशा मागणीचे निवेदन दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दमानियांनी खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की खडसे यांच्यावर याआधी देखील भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना केलेली भाषा ही अत्यंत आक्षेपार्ह अशी असून आपण या संदर्भात वाकोला पोलिस स्थानकामध्ये तक्रार केलेली आहे. तरी अद्यापही पोलिसांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आपण खडसे यांना राज्यपालांनी आमदार करू नये अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. एकनाथराव खडसे यांच्या भाषणाबाबत आपण शरद पवार यांना फोन करून माहिती दिली असली तरी पवार यांनी खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप देखील अंजली दमानिया यांनी याप्रसंगी केला.

Protected Content