नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाचे आईस्क्रिम मॅन या नावाने प्रसिद्ध असलेले रघुनंदन कामत यांचं निधन झाले आहे. ते देशातील मोठी आईस्क्रिम चेन नॅचरल्स आईस्क्रिमचे मालक आणि संस्थापक होते. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शुक्रवारी त्यांनी मुंबईच्या एचएन रिलाइन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रघुनंदन कामत यांच्या निधनाची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून शनिवारी रात्री देण्यात आली. कंपनीने पोस्ट केल्यानुसार, नॅचरल्स आईस्क्रिमचे संस्थापक रघुनंदन कामत यांचं निधन झालं आहे. ही आमच्यासाठी अत्यंत दु:खद गोष्ट आहे.

रघुनंदन कामत यांचा जन्म कर्नाटकातील मंगळुरूमधील एका गावात झाला होता. त्यांना पाच भाऊ-बहिण होते. त्यांचे वडील फळ विक्रेते होते. लहान वयापासून ते वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करीत होते. त्यामुळे फळांबाबतची इत्यंभूत माहिती ते आपल्या वडिलांकडून शिकले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडलं. मुंबईत आल्यानंतर त्यांनी आपल्या भावाच्या रेस्टॉरंटमध्ये काम सुरू केलं. मात्र काही काळानंतर त्यांनी वेगळा मार्ग निवडला. १४ फेब्रुवारी १९८४ मध्ये त्यांनी काही जणांना एकत्र घेऊन आईस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी जुहूमध्ये एक आईस्क्रिम पार्लरची सुरुवात केली. सुरुवातील त्यांनी १२ फ्लेवर्सच्या आईस्क्रिम ठेवल्या होत्या. आईस्क्रिमला मागणी वाढत होती. यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर त्यांनी १९९४ मध्ये आणखी पाच आऊटलेट सुरू केले. सद्यस्थितीत नॅचरल्स आईस्क्रिमचे १५ शहरांमध्ये १६५ हून अधिक आऊटलेट आहेत. विशेष म्हणजे आईस्क्रिम तयार करण्याची पद्धत ते आपल्या आईकडून शिकले.

Protected Content