हडप्पा संस्कृतीतील नवीन स्थळाचा लागला शोध

राजकोट-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खजिन्याच्या शोधात एका हडप्पा संस्कृतीतील आणखी एका स्थळाचा शोध लागला आहे. जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या कच्छमधील धोलावीरा स्थळापासून ही जागा ५१ किलोमीटर अंतरावर सापडली आहे. लोद्राणी असं या जागेचं नाव आहे. पाच वर्षांपूर्वी जवळपासच्या काही गावकऱ्यांनी सोन्याच्या शोधात लोद्राणी येथे खोदकाम सुरु केले. याठिकाणी त्यांना सोने तर मिळाले नाही पण अनेक पुरातन वस्तू आढळून आल्या. पुरातत्वशास्त्रज्ञांनी याठिकाणी जेव्हा शोध सुरु केला तेव्हा त्यांना हडप्पा काळातील वस्ती आढळून आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. ऑक्सफर्ड स्कूल ऑफ आर्केलॉजीमधील तज्ज्ञ अजय यादव आणि प्रोफेसर डामिअन रॉबिनसन यांनी या भागातील प्राथमिक उत्खनन सुरु केले. त्यांनी सांगितलं की, याठिकाणी सापडलेले पुरातत्व पुरावे आश्चर्यकारकरित्या ढोलाविरा येथे सापडलेल्या पुराव्यांसारखे आहे.

यादव यांनी सांगितलं की, लोद्राणी ठिकाणी गेले अनेक वर्ष दगडांच्या ढिगाऱ्याखाली राहिले आहे. गावकऱ्यांना वाटत होतं की याठिकाणी मध्ययुगीन एक किल्ला आहे आणि त्याठिकाणी खजिना गाडला गेला आहे. पण, जेव्हा आम्ही शोध सुरु केला तेव्हा त्याठिकाणी हडप्पा संस्कृती सारखे पुरावे आढळलेत. ४५०० वर्षांपूर्वी याठिकाणी एक छोटे शहर वसलेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अज्ञातात राहिलेले लोद्राणी अखेर जगासमोर आले आहे. जानेवारी महिन्यात या स्थळाला मरोधारो ( गुजरातीमध्ये याला कमी मिठ असलेले पिण्यायोग्य पाणी) असं नाव देण्यात आले. हडाप्पा काळातील अनेक वस्तू याठिकाणी आढळल्या आहेत. ढोलाविरा आणि या नव्या जागेत खूप साम्य आहे. यादव यांच्या म्हणण्यानुसार, याठिकाणी २६००-१९०० BCE ते १९००-१३०० BCE या काळात वस्ती होती. अधिक खोदकाम केल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.

यादव यांनी सांगितलं की, आम्हाला वाटतं की धोलावीरा आणि नव्याने सापडलेले स्थळ दोन्ही समुद्रावर अवलंबून होते. दोन्ही ठिकाणे रन ऑफ कच्छच्या वाळवंटाजवळ आहे. जो कधीकाळी समुद्र होता. दरम्यान, १९६७-६८ मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ जीपी जोशी यांनी लोद्राणी भागाचे सर्वेक्षण केले होते. त्याठिकाणी हडप्पा संस्कृती असल्याचा दावा त्यांनी केला होता. पण, पुरावे आढळले नव्हते. अखेर पाच वर्षांपूर्वी लोकांच्या लोभापायी का असेना पण या स्थळाचा शोध लागला.

Protected Content