घोटीटेक शिवारात ट्रक-टिपरचा भीषण अपघात; दोन्ही वाहनाचे चालक जागीच ठार

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मृत्यू कुणाला कधी आणि केव्हा गाठेल, हे सांगता येत नाही. रामटेक- तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील घोटीटोक शिवारात रविवारी रात्री मध्यरात्री बारा ते एक वाजताच्या दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या दोन जड वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच-३२-क्यू-१०९२ क्रमाकांच्या ट्रकचा चालक राजू कोंडू कुथे (वय ४०),रा. खापा ( तुमसर )जि. भंडारा हा डोंगरी बुजुर्ग येथून मॅगनीज घेऊन तुमसरकडून रामटेककडे जात होता तर टिपर क्रमांक एमएच-४०- बीएफ-३४३४ चा चालक रुपेश राजकुमार धुर्वे (वय २२) रा. कुरकोटी, ता. कुरई, जि. शिवनी(मध्यप्रदेश) हल्ली मुक्काम खरबी, नागपूर हा गिट्टी घेऊन रामटेक येथून तुमसरकडे जात होता.

दोन्ही वाहने भरधाव होती. घोटीटोक शिवारात येताच दोन्ही वाहने समोरासमोर भिडली. दोन्ही ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही चालक जागीच ठार झाले. जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांनी अपघाताची माहिती रामटेक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्‍थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह रुग्णालयात पाठवून दिले.

रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर जडवाहतुकीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या महामार्गावरील काही ठिकाणी अपूर्ण काम झाले असून दिशादर्शक नसल्यामुळे मार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. घोटीटोक हा तुमसर, भंडारा, रामटेक, अशा तिन्ही महामार्गांना जोडणारा चौक असल्याने लवकरात लवकर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी संजय झाडे यांनी केली आहे.

Protected Content