घरफोडी करून महागड्या साड्या लांबविणारा अल्पवयीन चोरटा ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । एक महिन्यापासून माहेरी धुळे येथे गेलेल्या शिक्षीकेच्या घरातून दहा महागड्या साड्यांची चोरी झाल्याची घटना मोहाडी रोडवरील जीवनमोती कॉलनीत आज सकाळी उघडकीस आली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत आहे. 

सविस्तर माहिती अशी की, वृंदा गणपतराव गरुड या जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका असून त्यांचे निवासस्थान पाचोरा रस्त्यावरील गुंजन मंगल कार्यालयासमोर जिवनमोती कॉलनीत आहे. शिक्षीका वृंदा गरुड यांचे पती पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले होते. दरम्यान वृंदा गरुड या गेल्या एक महिन्यापासून माहेरी धुळे येथे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. घराच्या चाव्या त्यांच्याकडेच होत्या. दरम्यान एक महिन्यापासून घर बंद असल्याचे बघून अल्पवयीन मुलाने त्यांच्या घराच्या दाराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून २५ हजार ३०० रूपयांच्या महागड्या १० साड्यांची चोरी केली. श्रीमती गरूड यांचा पुतण्या कुणाल पुरूषोत्तम गरूड याने फोनद्वारे घरात चोरी झाल्याचे कळविले. आज सकाळी ८ वाजता वृंदा गरूड घरी आल्या असता कडी कोयंडा तोडलेला दिसून आला. घराची पाहणी केली असता साड्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलीसांनी तांबापुरा परिसरातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याने घरातून साड्यांची चोरी केल्याचे कबुल केले. दुसरा संशयित आरोपीही अल्पवयीन असून तो फरार आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, इमरान सैय्यद, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंडे, सचिन पाटील, सुधीर साळवे यांनी केली. संशयित आरोपींकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी दिली.

 

Protected Content