अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील साहित्यिक मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्याची अडचण निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येणार आहे, असे भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत दररोज एक तास वाचनावर भर दिला आहे. मराठी भाषा धोरण महिनाभरात जाहीर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना जगभरातील पालक त्या-त्या ठिकाणच्या मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना दररोज एक तास पाठवतात. महाराष्ट्राबाहेरही बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलनांना 25 लाख रुपये निधी देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी युवक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये अनुदानही देण्यात येईल. मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या कळवा, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.