राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे – सुमित्रा महाजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते. राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे. उत्तम साहित्य हे चांगला विचार देते, यासाठी ग्रंथवाचन केले पाहिजे, असे आग्रही विचार लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी होते.

व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, संमेलनाध्यक्ष तथा ग्रांमीण विकासमंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे संरक्षक तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, संमेलनाचे महाव्यवस्थाप्रमुख बजरंगलाल अगवाल, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, कार्यवाह प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेंदळे, सचिव राजेंद्र भामरे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक, कोषाध्यक्ष नीरज अग्रंवाल, अखिल भारतीय महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते, विलास मानेकर, डॉ.दादा गोरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा.किरण सगर, प्रा.मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, डॉ.गजानन नागरे, पुरुषोत्तम सप्रे, डॉ.विद्या देवधर, कपूर वासनिक, जयंत कुळकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीतील सभामंडप एकमध्ये उद्घाटन करताना सुमित्रा महाजन यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची सर्वांची नावे न घेता ‌‘सभी मेरे अपने’ असे म्हणून आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. खान्देशातील मातीला कर्तृत्वाचा सुगंध आहे. पूज्य साने गुरुजी, ना.धों. महानोर यांच्यासारखे कर्तृत्ववान माणसं लाभले आहेत, असेही सुमित्र महाजन यांनी स्पष्ट केले.

प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.रमेश माने यांनी लिहिलेल्या व उत्तराताई केळकर आणि डॉ.अमोघ जोशी यांनी गायिलेल्या ‌‘माय मराठी नित्य लाविते टिळा’ या गीताने संमेलनाची सुरुवात झाली. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील म्हणाले, आमचा अमळनेर हा अवर्षणग्रस्त तालुका असताना महामंडळाने साहित्य संमेलन घेण्याचा मान दिला याबद्दल पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आभार मानले. ही संतांची भूमी आहे, पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आहे. जगात पोहोचलेल्या विप्रो कंपनीचे अजिज प्रेमजी, श्रीमंत प्रतापशेठजी यांना विसरुन चालणार नाही. कष्टकऱ्यांना या संमेलनातून पाझर फुटावा, अशी अपेक्षाही मंत्री अनिल पाटील यांनी साहित्यिकांकडून व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे, राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ.भरतदादा अमळकर आदी मान्यवर उपस्थित होते. विविध शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, राज्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी, नागरिक उपस्थित होते. संमेलनाचे सहसचिव डिगंबर महाले व मृण्ययी भजक यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला मेहेंदळे यांनी आभार मानले.

Protected Content