जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमध्ये सीटवर बसल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद होऊन सुरेश गणपत पाटील (रा. चांदसर, ता. धरणगाव) यांना मारहाण करण्यात आल्याची घटना जळगावातील नवीन बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील शेतकरी सुरेश पाटील हे कामानिमित्त शुक्रवारी १२ जानेवारी रोजी जळगाव शहरात कामानिमित्त आलेले होते. काम आटोपून ते घरी जाण्यासाठी जळगाव येथील बसस्थानकात आलेले होते. दुपारी २ वाजता बसमध्ये बसल्यानंतर सीटवर बसण्याच्या कारणावरुन पाळधी, ता. धरणगाव येथील समाधान देवीदास महाजन यांच्यासोबत वाद झाला. हा वाद वाढत जाऊन सुरेश पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यामध्ये सुरेश पाटील यांचा हात फॅक्चर होऊन दातांनाही दुखापत झाली. या प्रकरणी सुरेश पाटील यांनी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुवर्णा तायडे करत आहेत.