Home Cities जळगाव किशोरआप्पांना मोठा धक्का; पुत्र सुमित रिंगणाबाहेर; सतीश शिंदेंची बिनविरोध बाजी !

किशोरआप्पांना मोठा धक्का; पुत्र सुमित रिंगणाबाहेर; सतीश शिंदेंची बिनविरोध बाजी !

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित किशोर पाटील यांनी पाचोरा तालुका विकासो मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज छाननीनंतर नामंजूर करण्यात आल्याने भाजपचे सतीश परशूराम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.

जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना सुमित पाटील यांच्या अर्जावर सतीश शिंदे यांनी हरकत नोंदविली होती. सुमित पाटील हे आवश्यक कालावधीपासून संबंधित संस्थेचे सभासद नसल्याचा तसेच आवश्यक अनुभवाच्या निकषांची पूर्तता होत नसल्याचा मुद्दा हरकतीत उपस्थित करण्यात आला होता.

या हरकतीवर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जाच्या वैधतेबाबत निर्णय घेतला. यात सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर ठरल्याने ते या निवडणुकीतून बाद झाले आहेत. तर यामुळे त्यांचे विरोधत सतीश शिंदे यांची पाचोरा सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे. याआधी पारोळा व एरंडोलमधून अनुक्रमे नलीनी चिमणराव पाटील आणि मृणाल अमोल पाटील यांची तर भुसावळमधून रजनी संजय सावकारे यांची बिनविरोध निवड झालेली होती. या पाठोपाठ आता सतीश शिंदे यांच्या रूपाने भाजपची दुसरी जागा तर महायुतीची चौथी जागा बिनविरोध झाली आहे.

दरम्यान, सुमीत किशोरआप्पा पाटील यांनी संकेत दिल्यानुसार, ते आपला अर्ज बाद झाल्यानंतर यावर हरकत घेणार असल्याचे निश्चीत झाले आहे. यासोबत, ते न्यायालयात जाण्याची देखील शक्यता आहे. यामुळे सतीश शिंदे यांची आज बिनविरोध निवड निश्चीत झाली असली तरी सुमीत पाटील यांच्या हरकतीवर नेमका काय निर्णय होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लागोपाठ दहा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक असल्याने नियमानुसार आ. किशोर पाटील हे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नव्हते. यामुळे त्यांनी पाचोरा तालुक्यातून त्यांचे पुत्र सुमित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी या मतदारसंघातून एकापेक्षा अधिक नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याने त्यांचे कट्टर विरोधक असलेले भाजप नेते अमोल शिंदे यांचे काका सतीश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे जिल्हा बँकेत आमदार किशोरआप्पा यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष निवडणूक लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दिग्गजांच्या उमेदवारीवर होत असलेल्या निर्णयांमुळे जिल्हा बँकेची निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound