मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महायुतीमध्ये तिन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. शिवसेना नेते, मंत्री तानाजी सावंत हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाचे एक-एक मुख्य प्रवक्ते महायुतीकडून नियुक्त केले जाणार आहे. तिन्ही पक्षाचे मुख्य प्रवक्ते जे बोलतील तीच महायुतीची अधिकृत भूमिका असेल. याशिवाय इतर कोणाचीही अधिकृत भूमिका नसणार, असा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेत निर्माण होत आहेत. महायुती बरोबरच बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यामुळे त्यांचे पक्षही अडचणीत येत असल्याची तिन्ही घटक पक्षाची भावना आहे. त्यामुळे तीनही पक्षांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.