जळगाव प्रतिनिधी । आरोपींना जामीनास विरोध करावा यासाठी सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागणाऱ्या सरकारी वकिलाला नाशिक येथील अन्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने रंगेहात पकडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिका माहिती अशी की, तक्रारदार हे भुसावळ शहरातील रहिवाशी आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींना जामीनास विरोध करावा व जामीन मिळू नये यासाठी तक्रारदार यांनी सरकारी वकील ॲड. राजेश साहेबराव गवई (वय-५०) रा. भुसावळ जि.जळगाव यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान, यासाठी सरकारी वकील गवई यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रूपयांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार यांनी नाशीक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून ॲड. गवई यांनी ५ हजार रूपयांची लाच घेतांना शहरातील तापी पाटबंधारे कार्यालयासमोर रंगेहात पकडले आहे. ॲड. गवई यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक येथील पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, पो.नि. उज्जवलकुमार पाटील, पो.ना. प्रकाश महाजन यांनी ही कारवाई केली.