Home Cities पारोळा नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी पारोळ्यातून मदतीचा हात ; स. ध. भावसार यांचे १० हजार...

नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी पारोळ्यातून मदतीचा हात ; स. ध. भावसार यांचे १० हजार रुपयांचे योगदान

0
5


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नेपाळमध्ये आलेल्या प्रलयंकारी महापुरामुळे मोठे मानवी संकट निर्माण झाले असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला, तर हजारो जण बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या उदात्त भावनेतून पारोळ्यातील राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक स. ध. भावसार यांनी नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीत १० हजार रुपयांचे योगदान दिले आहे.

संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणे हीच खरी माणुसकी असल्याचे भावसार यांच्या कृतीतून अधोरेखित झाले आहे. देशाच्या कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट किंवा गरजू नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्यास आपल्या परीने मदत करण्यासाठी भावसार हे नेहमीच पुढाकार घेत असल्याचे सांगण्यात आले. ‘देशासाठी दिलेले योगदान कधीही अल्प नसते’, या भावनेतून स. ध. भावसार यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रमांना मदत केली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीत त्यांनी आजवर तब्बल २ लाख ६ हजार रुपयांचे योगदान दिले आहे. निवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत समाज आणि राष्ट्राच्या गरजेच्या वेळी मदतीसाठी पुढे येण्याची त्यांची परंपरा कायम आहे.

नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेली ही मदत प्रसिद्धी किंवा कौतुकासाठी नसून, संकटात सापडलेल्या मानवाच्या मदतीला धावून जाण्याच्या भावनेतून असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते. त्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेचे पारोळा शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करत त्यांच्या उपक्रमाबद्दल आदर व्यक्त केला. नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी देण्यात येणाऱ्या १० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश आणि आवश्यक पाकीट स. ध. भावसार यांनी जय हिंद कॉलनी उपडाकघर कार्यालयातील डाक सहाय्यक विनायक जोशी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी राष्ट्राच्या संकटसमयी आपल्या परीने छोटासा हातभार लागावा, या भावनेतून ही मदत करण्यात येत असल्याचे भावसार यांनी सांगितले.


Protected Content

Play sound