जिल्ह्यातील दिव्यांगासाठी १० ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिव्यांगांसाठी आधारस्तंभ असलेले उडाण फाऊंडेशन व गोदावरी फाऊंडेशनतर्फे बुधवार, दि.१० ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात ० ते २५ वयोगटातील आणि प्रामुख्याने ० ते ६ वयोगटातील दिव्यांगांची सुमारे ५ हजार रुपयांची मोफत तपासणी केली जाणार असल्याची माहिती उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिबिरासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्ह्यात नेहमी दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या उडाण फाऊंडेशनतर्फे एक भव्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. गोदावरी फाऊंडेशन व जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या सहकार्याने आयोजित शिबिराचे जळगाव शहरातील रिंगरोडवरील उडाण केंद्रात बुधवार, दि.१० रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रमुख पाहुणे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, संचालिका डॉ.केतकी पाटील, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उडाणच्या संचालिका हर्षाली चौधरी यांची उपस्थीती राहणार आहे.

शिबिरात शून्य ते २५ वयोगटातील दिव्यांगांची विविध प्रकारची तपासणी केली जाणार आहे. मुख्यत्वे शून्य ते ६ वयोगटातील दिव्यागांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. शिबिरात मोफत ईसीजी कार्डिओग्राफ, मधुमेह, रक्तदाब तपासणी केली जाणार आहे. याशिवाय कान-नाक-घसा विकार, नेत्रविकार, हृदयविकार, मेंदू व मणका विकार, अस्थिरोग, बालरोग, नवजात शिशु रोग, त्वचारोग, मानसिक आजारांची तपासणी व उपचार मोफत केले जाणार आहे. नवजात शिशु तज्ञ्, तसेच बालरोग तज्ञ यांच्याकडून प्रत्येक बालकाची योग्य तपासणी, बालकांच्या वाढीत येणाऱ्या अडचणी, तसेच स्पीच थेरीपीस्ट, सायकोलॉजिस्ट,, कॉन्सिलर, त्वचा रोगतज्ञ यांच्याकडून तपासणी आणि शिक्षणातील अडचणीवर सल्ला मार्गदर्शन केले जाणार आहे. साधारण: ३०० दिव्यागांची तसेच सोबत आलेल्या पालकांचीही यावेळी मोफत तपासणी केली जाणार आहे.

शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असून ऑनलाईन व ऑफलाईन उडाण कार्यालयात अशा दोन्ही पद्धतीने नावनोंदणी करण्याची सुविधा आहे. अधिक माहितीसाठी उडाण कार्यालय किंवा मो.9284382079, 9309978389, 956195950734 यावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त दिव्यांगांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उडाणच्या संचालिका हर्षाली चौधरी यांनी केले आहे.

 

Protected Content