नाशिक मतदारसंघात होणार चौरंगी लढत

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदार संघात ठाकरे गटातून बंडखोरी करत विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असतांना ठाकरे गटात बंडखोरी झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात अगोदरच महायुतीच्या उमेदवार ठरण्यावरून रस्सीखेच सुरू होती. शेवटी महायुतीतून ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली आणि विदयमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी आहे. पण नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही आव्हानात्मक आणि चुरशीची ठरणार आहे.
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे, तर जय बाबाजी भक्त्त परिवाराचे शांतीगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवत आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे नाशिकची लढत चौरंगी झाली आहे, त्यामुळे हेमंत गोडसे यांना यावेळी नाशिकमध्ये विजय मिळवणे सोपे नाही आहे. गेल्या वर्षी विजय करंजकर हे २०१९ लोकसभा निवडणुकीला सुध्दा इच्छुक होते. पण, त्यावेळेस हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. यावेळेस गोडसे हे शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे करंजकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Protected Content