जनतेच्या प्रेमाने भारावलो : आ. गुलाबराव पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आपण आजवरचे आयुष्य हे जनतेसाठी व्यतीत केले असून जनसेवेसाठीच नवीन मार्ग पत्करला असून या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी ज्या प्रकारे समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक येत आहेत ते पाहून आपण भारावलो असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

मुंबईतील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच पाळधी येथील आपल्या घरी आलेल्या गुलाबभाऊंना भेटून त्यांच्या निर्णयाबद्दल समर्थन देण्यासाठी जिल्हाभरातून हजारो आबालवृध्दांनी त्यांची भेट घेतली. भाऊंना आता आधीपेक्षाही महत्वाचे मंत्रीपद मिळावे आणि याच्या सोबतीलाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा या लोकांनी व्यक्त केली असून आ. गुलाबराव पाटील यांनी मात्र आपण नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणार असल्याचे सांगत जनतेच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

 

मुंबईत नुकतेच सत्तांतर झाले. यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. या सत्ता संघर्षात जळगावचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांची महत्वाची भूमिका असल्याचे अधोरेखीत झाले. विशेष करून शिंदे सरकारने विश्‍वासमत मिळविल्यानंतर त्यांनी केलेले घणाघाती भाषण तुफान लोकप्रिय  झाले असून याचे कौतुक करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आ. गुलाबराव पाटील हे काल सायंकाळी उशीरा पाळधी येथे दाखल झाले. विशेष बाब म्हणजे त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. काल रात्रीपासूनच भाऊंच्या समर्थकांचे थवे पाळधीकडे येतांना दिसून आले. आज सकाळी आठ वाजेपासून ते लोकांच्या गराड्यात असल्याचे दिसून आले. यात जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आ. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या निर्णयाला पाठींबा दर्शविला.

 

दरम्यान, याप्रसंगी उपस्थितांशी अनौपचारीक संवाद साधतांना आ. गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून ते कुणी आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तर, ठाकरे कुटुंबाविषयी देखील आपल्या मनात आदर असून तो शेवटपर्यंत कायम राहणार आहे. आमच्या तक्रारी ऐकून न घेतल्याने आणि विशेष करून कामे होत नसल्याने आम्ही सत्तेत असून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आमच्या सोबत अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी येणार असल्याचे ते म्हणाले.

 

तसेच  ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्रावर मी आजवर वाटचाल केली असून आगामी काळात देखील हीच वाटचाल कायम राहणार आहे. आजवरच्या प्रवासात लोकांचे मला खूप सहकार्य लाभले. आणि आता राजकीय वाटचालीतील एक अतिशय महत्वाच्या निर्णायक वळणावर देखील जनता माझ्यासोबत उभी असल्याचे पाहून मी भारावून गेलो आहे. जनतेचे प्रेम हीच माझी शक्ती असून यातूनच आगामी काळात जनसेवेला बळ मिळणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

दरम्यान, आ. गुलाबराव पाटील यांना भेटीला येणार्‍यांनी त्यांना चांगले मंत्रीपद भेटावे अशी अपेक्षा व्यक्त केली. गुलाबभाऊंनी पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यात अतिशय कार्यक्षमपणे काम केले असून ग्राम विकासासाठी संबंधीत ग्रामविकास खाते व याच्या जोडीला सार्वजनीक बांधकाम वा जलसंपदा यापैकी कोणते तरी खाते त्यांना मिळावे अशी पदाधिकार्‍यांनी अपेक्षा व्यक्त केली. सोबत जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाऊंची निवड झाल्यास जिल्हा विकास आधीच्याच वेगाने सुरू राहणार असल्याचा आशावाद देखील व्यक्त करण्यात आला.

 

Protected Content