Home Cities जळगाव जिल्हा परिषदेत बदल्यांचा धडाका; आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेत बदल्यांचा धडाका; आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मंगळवार १३ मे पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार १४ मे रोजी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

आरोग्य विभागांतर्गत एकूण ९ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. यामध्ये प्रशासकीय कोट्यातून १९ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, तर ३१ कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीचा लाभ घेतला. याव्यतिरिक्त, ६ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्याही यावेळी करण्यात आल्या.

ग्रामपंचायत विभागातही बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. या विभागातील २ संवर्गातील एकूण २० कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या, तर ४० कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या विनंतीनुसार दुसरीकडे बदली करून घेतली.

संपूर्ण बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शकपणे पार पडली. समुपदेशन प्रक्रियेद्वारे आणि इन कॅमेरा रेकॉर्डिंगसह ही प्रक्रिया राबवण्यात आली, जेणेकरून कोणतीही तक्रार किंवा गैरप्रकार होण्याची शक्यता टाळता येईल.

या बदली प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षिका या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तर ग्रामपंचायत विभागात ग्राम विस्तार अधिकारी आणि ग्राम विकास अधिकारी यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन ही बदली प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली.


Protected Content

Play sound