Home क्राईम मुक्ताईनगरमध्ये पंपगृह तोडफोड प्रकरणाला वेगळे वळण ; एफआयआरला दिरंगाई

मुक्ताईनगरमध्ये पंपगृह तोडफोड प्रकरणाला वेगळे वळण ; एफआयआरला दिरंगाई


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात खामखेडा पुलाजवळ असलेल्या मुक्ताई सहकारी उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहासंदर्भातील प्रकरणाने नव्याने वळण घेतले असून, सुरुवातीला चोरीचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या या घटनेत प्रत्यक्षात पंपगृहाची तोडफोड करून साहित्य स्थलांतरित करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक सिंचन योजनेशी संबंधित असलेले हे प्रकरण गंभीर मानले जात असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी या पंपगृहातील साहित्य गायब झाल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर चोरी नसून नियोजनबद्धरीत्या पंपगृहाची तोडफोड करून साहित्य दुसरीकडे हलविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार जलसंपदा विभागाला कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता, तापी खोरे सर्वेक्षण विभाग, जळगाव यांनी उपविभागीय अभियंता, तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभाग यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पंपगृहाची तोडफोड व साहित्य स्थलांतरामुळे विभागाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे या संदर्भात २० तारखेलाच गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असतानाही अद्याप मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झालेला नाही. त्यामुळे “स्पष्ट आदेश असूनही गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई का?” असा प्रश्न आता नागरिकांसह विविध स्तरांतून उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाशी संबंधित आणि शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम करणारे हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असताना प्रशासन व पोलिसांकडून होत असलेल्या विलंबामुळे संशयाची छाया निर्माण होत आहे. संबंधितांवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.


Protected Content

Play sound