अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी

धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल |धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळ भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील दांपत्य हे गंभीर जखमी झाल्याची घटना २८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, कैलास देविदास निकुंभ (वय-४०), रा. पाथराड ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता कैलास निकुंभ हे त्यांची पत्नी शितल निकुंभ यांच्यासोबत दुचाकी (एमएच १९ एझेड ९९०४) या दुचाकीवरून धुळे तालुक्यातील जुनोनी येथे नातेवाईकांकडे जात होते. दरम्यान धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळ समोरून येणारी अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेजण रोडवरून खाली पडले, यात पती-पत्नी हे दोघे जखमी झाले, त्यांना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कैलास निकुंभ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र बदाने हे करीत आहे.

Protected Content