भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर खऱ्या मतदारांची नावे वगळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने हरकती दाखल केल्या जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल चौधरी यांनी केला आहे. या प्रकाराविरोधात सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाला थेट इशारा दिला. एकाही खऱ्या मतदाराचे नाव वगळले गेले, तर सर्वपक्षीय नेते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी मंत्री संजय सावकारे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भुसावळ येथे आयोजित या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, भीमशक्ती, संविधानवादी संघटना यांसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदार यादीतील कथित हरकती आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली. अनिल चौधरी यांनी आरोप केला की, गेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत मंत्री संजय सावकारे यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यानंतरपासून भुसावळ शहरात गेल्या दीड महिन्यापासून मतदारांची नावे कमी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदानासंदर्भातील हरकती भुसावळ मतदारसंघात दाखल झाल्या असून, या प्रकारामुळे निवडणूक आयोगही अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.

हरकती दाखल करणाऱ्यांच्या वास्तव्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आगाखान वाड्यात राहणारी व्यक्ती साताऱ्यातील मतदारांबाबत, तर शिंदे कॉलनीत राहणारी व्यक्ती दुसऱ्या भागातील मतदारांबाबत हरकत घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित भागाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींकडून हरकती घेतल्या जात असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी चर्चा केल्याचे चौधरी यांनी सांगितले. नागरिकांचा मतदानाचा घटनात्मक हक्क हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. एकाही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने मतदार यादीतून वगळले गेले, तर सर्वपक्षीय नेते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच प्रशासनाने या प्रकरणात कोणतीही चूक होऊ देऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
बोगस हरकती दाखल करणाऱ्यांना अल्टिमेटम देताना चौधरी म्हणाले की, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने हरकती घेतल्या आहेत, त्यांनी तातडीने प्रतिज्ञापत्र देऊन आपली हरकत चुकीची असल्याचे मान्य करावे. अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र भूमिका घेतली जाईल. चौधरी परिवाराने गेल्या ४० वर्षांत कधीही कोणाचे मतदान कमी करण्याचे किंवा वाढवण्याचे राजकारण केलेले नाही. आम्ही नेहमी समोरासमोर लढलो आहोत. षडयंत्र करून लढणे ही आमची पद्धत नाही. लढण्याची धमक असेल तर समोर येऊन लढा, असे आव्हानही त्यांनी दिले. यावेळी किशोर अप्पा पाटील यांच्या मुलाचा अर्ज कोणतेही योग्य कारण नसताना बाद करण्यात आल्याचा आरोपही अनिल चौधरी यांनी केला. या मुद्द्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.