Home क्राईम वरणगाव हत्याकांडातील आरोपींना अटक करा; सकल मुस्लिम समाजाची मागणी

वरणगाव हत्याकांडातील आरोपींना अटक करा; सकल मुस्लिम समाजाची मागणी

0
वरणगाव हत्याकांडातील आरोपींना अटक करा; सकल मुस्लिम समाजाची मागणी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढत्या मॉब लिंचिंग आणि सामूहिक जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, या गुन्ह्यातील १० आरोपींपैकी केवळ दोघांनाच अटक झाली आहे. उर्वरित ८ आरोपी अद्याप मोकाट आणि फरार असल्याचा गंभीर आरोप करत मुक्ताईनगर येथील सकल मुस्लिम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या या निवेदनात वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक ०२६७/२०२६ चा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. २ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११८(२), १८९(४), १९० तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ३ व २५ अन्वये हा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला होता. निवेदनातील माहितीनुसार, हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करत थेट गोळीबार केला होता. या अमानुष हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज ९ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या क्रूर घटनेत एकूण १० जणांचा थेट सहभाग असताना पोलिसांनी आतापर्यंत केवळ दोनच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. उर्वरित आठही आरोपी अद्याप फरार असल्याने पीडित कुटुंबीय, साक्षीदार आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दीड वर्षांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे घडलेल्या एका घटनेचा बदला घेण्याच्या पूर्वग्रहदूषित भावनेतून हा कट रचून हल्ला करण्यात आल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. मोकाट असलेले आरोपी पीडित कुटुंबावर आणि साक्षीदारांवर पुन्हा हल्ला करण्याची भीती असल्याने त्यांना तातडीने अटक करणे गरजेचे असल्याचे समाजाचे म्हणणे आहे.
या निवेदनामध्ये जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील सुलेमान रहीम खान पठाण या २१ वर्षीय तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणाचाही प्रकर्षाने संदर्भ देण्यात आला आहे. ११ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या त्या घटनेत एका तरुणाला जमावाकडून अमानुष मारहाण करून ठार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या अशा हिंसक घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, आता केवळ पोकळ आश्वासने नकोत तर दोषींवर कठोर आणि पारदर्शक कारवाई हवी, अशी ठाम भूमिका समाजाने घेतली आहे.
कोणत्याही राजकीय वा इतर दबावाला बळी न पडता गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा आणि सर्वोच्च न्यायालयाने मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर हत्याकांडाची तातडीने दखल घेऊन स्वतंत्र एसआयटी (SIT) गठीत करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता पोलीस प्रशासन या निवेदनाची कितपत गंभीर दखल घेते आणि फरार आठ आरोपींना जेरबंद करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.