जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सबलीकरणासाठी जळगाव जिल्ह्यात १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि आर्थिक साक्षरतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार उपस्थित होते. यावेळी १५ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा जनजातीय गौरव दिन आणि त्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सप्ताहातील विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय स्वाभिमान दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम गडचिरोली येथे होणार असून, जळगावसह सर्व जिल्हा मुख्यालये आणि आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यामध्ये आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करणे, भगवान बिरसा मुंडा यांच्यासह विविध आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना आणि पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करणे, तसेच रॅली व मिरवणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

गेल्या १२ वर्षांत पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या आदिवासी व्यक्ती, ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख झालेल्या आदिवासी समूहांसह सामाजिक नायक आणि समाजसेवकांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय आदिवासी महापुरुषांचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी उद्याने, चौक आणि रस्त्यांना आदिवासी महापुरुषांची नावे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर रोजी आधार कार्ड आणि शासकीय कागदपत्रांशी संबंधित सेवा शिबिर आयोजित केले जाणार आहे. अधिकृत यंत्रणेच्या सहकार्याने आधार कार्डमधील दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. वनपट्टेधारकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यासोबतच आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कृषी विभागाच्या ऑनलाइन योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
१७ नोव्हेंबर रोजी आरोग्य आणि पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्याने रक्तदाब, मधुमेह आदी आजारांची तपासणी केली जाईल. तसेच आदिवासी भागात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच पोषणबाग, परसबाग आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात येईल. कृषी आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्वही पटवून दिले जाणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सबलीकरण दिन साजरा करून सप्ताहाचा समारोप होणार आहे. या दिवशी महिला बचत गटांना उद्योग व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना कृषी, पशुसंवर्धन आणि कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाणार आहे.
याशिवाय बँक खाते, डिजिटल व्यवहार आणि आर्थिक साक्षरतेबाबत जनजागृती केली जाणार असून, आदिवासी युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार मेळावे आयोजित करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जाणार आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शासकीय योजनांची घोषणा न करता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी या सप्ताहातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.